बंगळुरू : अमुक एका गोष्टीची आवड कालांतराने इतकी वाढते की खऱ्या अर्थानं त्या ठराविक गोष्टीसाठी लक्षवेधी पावलं उचलली जातात. सध्या असंच लक्ष वेधत आहेत भारतातील एक फोटोग्राफर. ज्यांनी चक्क कॅमेराच्या आकाराचं घर उभारलं आहे. बरं इतक्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या मुलांची नावंही Canon, Epson, आणि Nikon अशी ठेवली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमधील बेळगाव येथे रवी आणि कृपा होंगल या दाम्पत्यानं भव्य अशा कॅमेराच्या आकाराचं घर उभारलं आहे. फोटोग्राफीच्या वेडापायी उभारलेलं त्यांचं हे घर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. मुख्य म्हणजे कॅमेरा आणि फोटोग्राफीबाबत त्यांना इतकी आत्मियता आहे की, मुलांनाही त्यांनी कॅमेराच्याच मोठमोठ्या ब्रँडची नावं दिली आहेत. घरावर बाहेरच्या भागात, दर्शनीय स्थळीसुद्धा त्यांच्या मुलांची Canon, Epson आणि Nikon ही नावं पाहायला मिळतात. एखाद्या कॅमेराप्रमाणेच त्यांच्या घराला खिडकीच्या रुपात व्ह्यूफाईंडर असल्याचं पाहायला मिळतं. तर, दुसरी खिडकी म्हणजे लेन्स. मेमरी कार्ड, चित्रफित आणि फ्लॅशही या घरावर पाहायला मिळतो. 


अतिशय आकर्षक अशा या घराच्या भींतींवर फोटोग्राफीशीच निगडीत काही ग्राफीक्सची कलाकुसर करण्यात आली आहे. आपल्या या अतिशय आगळ्यावेगळ्या तरीही तितक्याच रंजक घराविषयी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रवी म्हणाले, 'मी १९८६ पासून फोटोग्राफी करत आहे. हे घर बांधणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न साकार होण्याप्रमाणेच आहे. आम्ही आमच्या मुलांची नावंही Canon, Epson, आणि Nikon अशी ठेवली आहेत. ही सारी कॅमेराचीच नावं आहेत. मला कॅमेराशी विशेष प्रेम आहे, त्यामुळंच मी त्यांना कॅमेराची नावं दिली. कुटुंबाचा याला विरोध होता. पण, आम्ही मात्र या निर्णय़ावर ठाम होतो.'



 


हे घर उभारण्यासाठी या दाम्पत्यानं मित्रपरिवार आणि कुटुंबीयांकडूनही आर्थिक मदत घेतली. इतक्यावरच न थांबता त्यांनी या नव्या घरासाठी जुनं घरही विकलं. रवी यांच्या पत्नीनंही हे घर म्हणजे आपलं स्वप्न असल्याचीच प्रतिक्रिया दिली. अशी ही या कॅमेरारुपी घराची कहाणी, जे सध्या साऱ्या देशाचं लक्ष वेधत अगदी दिमाखात उभं आहे.