मुंबई : काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह संपण्याचे नाव घेत नाहीये. पंजाब काँग्रेसमधील सध्या सुरू असलेली मतभेद संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हाय कमांड समोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. बिहार काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी करणारा काँग्रेस पक्ष आता राज्यात नवीन प्रदेशाध्यक्ष शोधत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी भक्त चरण दास यांनी आमदार राजेश कुमार राम यांचे नाव पुढे केले आहे.


राजेश राम यांच्या नावावरुन वाद


बिहार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार राजेशकुमार राम यांच्या नावाची चर्चा असताना त्याला विरोध होऊ लागला आहे. बिहारमधील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मदन मोहन झा यांच्या जागी राजेश कुमार राम यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता.


पंजाब काँग्रेसमध्ये वाद


गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये उघड मतभेद दिसून येत आहेत. माजी मंत्री नवजोतसिंग सिद्धू आणि इतर काही नेत्यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पक्षातील मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस हाय कमांडने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने मुख्यमंत्र्यांसह पंजाब काँग्रेसच्या 100 हून अधिक नेत्यांचा अभिप्राय घेतला आणि त्यानंतर हा अहवाल हायकमांडला सादर केला.


राजस्थानमध्ये ही वाद


राजस्थान काँग्रेसमध्ये देखील वाद सुरु आहेत. मधून मधून हे वाद पुढे येत असतात. पायलट यांनी याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कामावर उघडपणे बंड केले होते. हायकमांडला हा वाद तात्पुरता शांत करण्यात यश आलं असलं तरी देखील अजूनही राज्यात अंतर्गत कलह काय आहे.