नवी दिल्ली - सध्याचा जमाना ऑनलाईन ऑर्डर करण्याचा आहे. इंटरनेटमुळे घरबसल्या कोणत्याही ठिकाणावरून आपल्याला हवी असलेली वस्तू मागवणे शक्य झाले. आतापर्यंत खाण्यापिण्याच्या, रोजच्या वापराच्या, इलेक्ट्रॉनिक, घरगुती वापराच्या वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर केली जात होती. पण आता पेट्रोल आणि डिझेल ही इंधनही ऑनलाईन मागवता येणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पेट्रोल आणि डिझेल घरपोच देण्याची सुविधा सुरू केली आहे. या तेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार घरबसल्या कमीत कमी २०० लिटर पेट्रोल किंवा डिझेल मागवता येणार आहे. यासाठी कंपनीने रिपोज ऍपही सुरू केले आहे. त्यामाध्यमातून हे काम करता येणार आहे. तूर्त निवडक ठिकाणीच ही सुविधा दिली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच इंडियन ऑईल कार्पोरेशनने घरपोच पेट्रोल आणि डिझेल देण्याच्या सुविधेवर काम करण्यास सुरुवात केली होती. यानुसार सध्या चेन्नईमधील कोलत्तूरस्थित एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेलची घरपोच डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना कमीत कमी २०० लिटर आणि जास्तीत जास्त २५०० लिटर पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले.


रिपोज ऍपच्या माध्यमातून ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची मागणी करू शकणार आहेत. काही पेट्रोल पंप चालकांनी या सुविधेला विरोध केला आहे. त्यांच्या मते, घरपोच पेट्रोल किंवा डिझेल दिल्यामुळे आत्महत्यांची संख्या वाढू शकते.