Foxconn in Telangana : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ज्या कंपनीच्या प्रकल्पावरुन राजकारण पेटलं होतं तो आयफोन (iPhone) निर्मात्या फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प आता शेजारील तेलंगणा राज्यात सुरु होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फॉक्सकॉन (Foxconn) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. यामुळे येत्या 10 वर्षात एक लाख लोकांना रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 मार्च रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (k chandrashekar rao) यांची फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट झाली होती. यादरम्यान फॉक्सकॉनने तेलंगणामध्ये मोठी गुंतवणूक करण्याबाबत म्हटले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत फॉक्सकॉन तेलंगणामध्ये गुंतवणूक करत असल्याची घोषणा करण्यात आली. तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे.


"देशातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. एकाच कंपनीत लाखो लोकांना थेट रोजगार मिळणे हे दुर्मिळ आहे. फॉक्सकॉनचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेटअप युनिट तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यास मदत करेल. तसेच राज्यात असे अधिक उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल," असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.



तर "या निर्णयामुळे उत्साहित झालो आहे. मला वाटत आहे की तेलंगणा वेगाने पुढे जात आहे. हा वेग उच्च तंत्रज्ञान उद्योगासाठी आवश्यक आहे. मला विश्वास आहे की तेलंगणासोबत काम करून आम्ही फॉक्सकॉनचा महसूल दुप्पट करू शकतो," अशी प्रतिक्रिया फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी दिली आहे.


फॉक्सकॉन आणि अ‍ॅपलचा संबंध काय?


फॉक्सकॉन अ‍ॅपलसाठी आयफोन असेंबल करते. आयफोनचे भाग जगभरातील विविध पुरवठादारांकडून विकत घेतले जातात. सर्व भाग चीनमधील फॉक्सकॉनच्या कारखान्यात पाठवले जातात. चीनमधील झेंगझोऊ येथील या प्लांटमध्ये सुमारे साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. फॉक्सकॉन पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन या कंपन्यादेखील अ‍ॅपलची निर्मिती करतात. 


फॉक्सकॉन चीनमधून प्रकल्प भारतात स्थलांतरीत करणार


अ‍ॅपल ही कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपची भागीदार असलेली कंपनी भारतात दीर्घकाळापासून आयफोनचे उत्पादन करत आहेत. फॉक्सकॉन समूह भारतात 700 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 5,740 कोटींची गुंतवणूक करणार आहे. चीनमधून प्रकल्प भारतात हलवण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या फॉक्सकॉन अॅपलच्या आयफोनसह इतर अनेक उत्पादनांचे उत्पादन वॉशिंग्टन आणि बीजिंगमध्ये करत आहे. मात्र आता फॉक्सकॉन हे उत्पादन पूर्णपणे भारतात आणण्याच्या तयारीत आहे.