Modi Stadium मध्ये प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ? सँडविच बनवतानाचा किळसवाणा Video व्हायरल
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सदरम्या अंतिम सामना पार पडला. या सामन्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video : आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) आता संपला आहे. 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्सदरम्यान (GT) पार पडला रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) अष्टपैलू खेळाच्या जोरावर चेन्नईने गुजरातवर मात केली आणि पाचव्यांदा आयपीएल ट्ऱॉफीवर नाव कोरलं. या विजयाबरोबरच चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या (MI) सर्वाधिक आयपीएल चॅम्पियन्सच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली. अंतिम सामन्यासाठी मोदी स्टेडिअम हाऊसफूल्ल झालं होतं. पण सामना पाहाण्यासाठी मोदी स्टेडिअमवर आलेल्या प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून हा व्हिडिओ पाहून तुमचाही संताप अनावर होईल. हा व्हिडिओ गुजरातमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील असल्याचा दावा केला जातोय. प्रेक्षकांना जे सँडविच देण्यात येत होते, ते सँडविच कसे बनवले (Dirty Sandwich) जात आहेत याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मोठ्या प्रमाणावर सँडविच बनवले जात आहेत. त्यासाठी ब्रेडचे तुकडे ठेवलेले दिसतायत. एक मोठ्या टोपात बटर असून सँडविच बनवणारा कर्मचारी कोणत्याही साहित्याचा वापर न करता उघड्या हातानेच ब्रेडवर बटर लावताना दिसत आहे. त्यानंतर ते ब्रेड टेबलवर ठेवले जात आहेत.
प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ
स्टेडिअममध्ये सामना पाहाण्यासाठी हजारो लोकं येतात. स्टेडिअममध्ये कोणताही खाद्यपदार्थ आतमध्ये नेण्यास बंदी असते. त्यामुळे प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. चार ते पाच तास चालणाऱ्या सामन्यादरम्यान भूक लागल्यास प्रेक्षक स्टेडिअममध्ये मिळणारे खाद्यपदार्थ विकत घेतात. पण हे खाद्यपदार्थ बनवताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं दिसतंय.
मोदी स्टेडिअमवर प्रेक्षकांची गर्दी
आयपीएलच्या टाईमटेबलनुसार 28 मे रोजी अंतिम फेरी खेळवण्यात येणार होती. पण पावसाने व्यत्यय आणला आणि हा सामना त्या दिवशी होऊ शकला नाही. त्याऐवजी राखीव म्हणजे दुसऱ्या दिवशी हा सामना खेळवण्यात आला. पण प्रेक्षकांच्या उत्साहात थोडीही कमतरता नव्हती. प्रचंड संख्येने प्रेक्षक अंतिम सामना पाहाण्यासाठी आले होते. नरेंद्र मोदी स्टेडिअम हे गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड असलं तरी मैदानावर यलो वादळ अवतरलं होतं. महेंद्रसिंग धोनीला पाठिंबा देण्यासाठी मोदी स्टेडिअमवर धोनीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
टीप : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्थात हा व्हिडिओ नरेंद्र मोदी स्टेडियमधालाच आहे की नाही याची झी 24 तास पुष्टी करत नाही