IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या
IPS officer: 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.
IPS officer: आयपीएस होणे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे स्वप्न असते. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही आयपीएस पदापर्यंत पोहोचू शकता. आयपीएस अधिकाऱ्याच्या दर्जा खूप महत्व असते. तो जिल्ह्यातील सर्वात मोठा पोलीस अधिकारी किंवा एसपी असतो. त्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर याबद्दल जाणून घेऊया.
सर्वप्रथम आयपीएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही आयपीएस अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी असते. या अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या पदावर बढती मिळते.पगाराव्यतिरिक्त, आयपीएस अधिकाऱ्याला इतर अनेक सुविधा देखील मिळतात. आयपीएस अधिकाऱ्याला घर आणि गाडीची सुविधा दिली जाते, मात्र पदाच्या आधारे गाडी आणि घराचा आकार ठरतो. यासोबतच चालक, गृहरक्षक आणि सुरक्षा रक्षकही आयपीएस अधिकाऱ्यांना पदानुसार दिले जातात. यासोबतच पोस्टानुसार वैद्यकीय उपचार, फोन आणि वीज बिलासाठीही भत्ता दिला जातो.
आयपीएस पगार
7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात. आयपीएस अधिकारी पदोन्नतीनंतर डीजीपी पदावर पोहोचू शकतो आणि डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. डीजीपी झाल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याला महिन्याला साधारण 2 लाख 25 हजार इतका पगार मिळतो.
आयपीएसला शैक्षणिक रजा घेऊन, देश आणि विदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता येते. त्यांना 30 दिवसांचे EL आणि 16 दिवसांचे CL देखील मिळते.मुलांना शिकवण्यासाठी वार्षिक शैक्षणिक भत्ता दिला जातो. देशातील मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये ते स्वत:साठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत उपचार घेऊ शकतात. यासोबतच वर्षातून एकदा प्रवासाची सवलतही मिळते. ते देशात कुठेही कौटुंबिक सहलीसाठी जाऊ शकतात.
आयपीएस अधिकारी कसे व्हाल?
आयपीएस अधिकारी दोन पद्धतीने होता येते. पहिली म्हणजे यूपीएसी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे. आणि दुसरी राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे. यूपीएससी परीक्षेत चांगल्या रँकसह उत्तीर्ण होणे आवश्यक असते. किंवा राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण करून, डीएसपी झाल्यानंतर, आयपीएस पदापर्यंत पोहोचता येते. पण यासाठी 15 ते 20 वर्षे लागू शकतात. यासाठी काही भौतिक निकषांची पूर्तता करणे देखील आवश्यक असते.