भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम तुमच्यासाठी फायद्याचा; आजच पाहा काय आहे प्रकरण
अट मात्र एकच...
नवी दिल्ली : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) कडून सातत्यानं प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या ऑफर्स दार केल्या जातात. त्यातच भर टाकत आता रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा एकदा आणखी एक नवा उपक्रम सर्वांच्याच भेटीला आणला गेला आहे. हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरु शकतो, असं म्हणायला हरकत नाही.
उत्तर भारताकडे फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे. याचाच अंदाज घेत भारतीय रेल्वेनं फिरस्त्यांसाठी खास भेट आणली आहे. ज्याअंतर्गत भारत दर्शन रेल्वेची सुरुवात करण्यात येत आहे. आयआरसीटीसीचे पीआरओ आनंद कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत दर्शन रेल्वेच्या माध्यमातून नागरिकांना उत्तर भारतातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
18 वर्षांवरील आणि कोरोनाच्या दोन्ही प्रतिबंधात्मक लसी घेतलेल्या नागरिकांना रेल्वेच्या संकेतस्थळावरूनच हे पॅकेज बुक करता येणार आहे. “VAISHNODEVI WITH UTTAR DARSHAN YATRA" असं या पॅकेजचं नाव आहे.
मध्य़ प्रदेशातील रेवा येथून ही भारत दर्शन रेल्वे धावेल. या दरम्यान, आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषीकेश, अमृतसर आणि वैष्णोदेवी अशा ठिकाणांवरुन जाईल. 8 ऑक्टोबरपासून ही रेल्वे रेवा येथून धावणार असून, सतना, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, इतरसी, विदीशा, गंज बदोसा, बिना आणि झाँसी यांसारख्या स्थानकांवरुन प्रवासी या रेल्वेमध्ये येतील.
धार्मिक स्थळं आणि देशातीव ऐतिहासिक महत्त्वं असणाऱ्या ठिकाणांना भेट देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता रेल्वेनं हे पॅकेज सर्वांच्या भेटीला आणलं आहे. 8505 रुपयांपासून या पॅकेजची सुरुवात होत असून, ही स्लीपर क्लाससाठीची किंमत आहे. 3 एसी पॅकेजसाठी प्रवाशांना 10395 रुपये मोजावे लागणार आहेत. या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांची सोय असणार आहे. तर, बजेट हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये प्रवाशांची राहण्याची सोय असेल.