रेल्वेकडून प्रवाशांसाठी `ही` नवी सुविधा, तिकीट रद्द करणार होणे सोपे
तिकीट खिडकीवरुन काढलेले तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द करताना प्रवाशांकडे तिकीट काढतेवेळी दिलेला मोबाईल नंबर असायला हवा.
नवी दिल्ली: एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे आता तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. यापूर्वी प्रवाशांनी थेट बुकिंग काऊंटरवरून तिकीट काढल्यास त्यांना ते तिकीट रद्द करायचे असल्यास पुन्हा तिकीट खिडकीवरच खेटे मारावे लागत. मात्र, आता रेल्वेने तिकीट खिडकी व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बुक केलेली तिकीटे ऑनलाईनच रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. तिकीट खिडकीवरुन काढलेले तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द करताना प्रवाशांकडे तिकीट काढतेवेळी दिलेला मोबाईल नंबर असायला हवा. याच्या साहाय्याने आयआरसीटीच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवासी तिकीट रद्द करु शकतात.
विशेष म्हणजे ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी प्रवाशांना तिकीट रद्द करता येऊ शकते. तर RAC किंवा प्रतिक्षा यादीतील तिकीट ३० मिनिटांपूर्वी रद्द होऊ शकते. यानंतर दुसऱ्या दिवशी तिकीट खिडकीवर जाऊन प्रवाशांना त्यांचे पैसे परत घेता येऊ शकतात. तर ऑनलाईन तिकीटाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करता येईल. रद्द झालेल्या तिकीटावरील नाव, पीएनआर क्रमांक, आसन क्रमांक आणि परत मिळणारी रक्कम ही माहिती संकेतस्थळावर पाहता येईल.