चुकूनही स्वत:हून रद्द करु नका तुमचं रेल्वे बुकिंगचं तिकिट
IRCTC ने प्रवाशांसाठी महत्वाची सुचना जारी केली
नवी दिल्ली : भारतामध्ये २१ दिवस लॉकडाऊन असेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली. कोरोनासाठी १५ हजार कोटींचं पॅकेज देखील त्यांनी जाहीर केले आहे. संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या सावटाखाली आहे. जीवनावश्यक सेवा सुरु राहतील असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर IRCTC ने प्रवाशांसाठी महत्वाची सुचना जारी केली आहे.
लॉकडाऊनच्या दरम्यान रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या ऑनलाईन तिकिट कॅन्सल करु नका असे आवाहन आयआरसीटीसीने केले आहे. त्या तिकिट आपोआप कॅन्सल होतील आणि त्याचे पैसे संबंधित प्रवाशाला मिळतील हे देखील रेल्वेने स्पष्ट केले आहे.
तिकिट काऊंटरवर जाऊन तिकिट रद्द करण्याची वेळ २१ जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वे प्रवास बंद केल्यानंतप ई तिकिट बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आयआरसीटीसीने दिली आहेत.
जर प्रवाशाने स्वत:हून आपली तिकिट रद्द केली तर त्याला रक्कम कापून मिळण्याची शक्यता आहे. पण असे न केल्यास तुमची संपूर्ण रक्कम मिळेल असे रेल्वेने जारी केले आहे. प्रवाशांनी ज्या बॅंक अकाऊंटमधून रक्कम पाठवली आहे त्यामध्ये ही रक्कम पुन्हा देण्यात येईल. रेल्वे रद्द झाल्यानंतर रेल्वेतर्फे कोणतेही शुल्क कापले जात नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.