नवी दिल्ली : पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) सणांच्या काळात खोऱ्यातील हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची मोठी योजना आखत आहे. काश्मीरमधील हिंदू मंदिरं आणि गर्दीच्या ठिकाणी हल्ल्याची तयारी करण्याबरोबरच राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार यूपी आणि बिहारमधील गुन्हेगारांना या कामासाठी वापरण्याची योजना आखली जात आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सफरचंद खरेदी करण्यासाठी शोपियांमध्ये गेलेले हिंदू व्यापारीही असू शकतात अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.


दहशतवादविरोधी कारवाई तीव्र


दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांनंतर सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली असून दहशतीचे जाळं नष्ट करण्यासाठी कारवाई केली जात आहे. गेल्या 36 तासांमध्ये सुरक्षा दलांनी 5 चकमकींमध्ये 7 दहशतवाद्यांना ठार केलं आहे, तर या कालावधीत 5 लष्करी जवान शहीद झाले आहेत. 


अनंतनागमध्ये दोन दहशतवादी ठार


शोपियां जिल्ह्यातील फेरीपोरामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. गेल्या 36 तासात काश्मिरमध्ये ही चौथी चकमक होती. काल दिवसभरात काश्मिरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन चकमकी झाल्या. पहिली चकमक अनंतनाग जिल्ह्यातील वीरिनाग परिसरात झाली, यात एक दहशतवादी मारला गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या कारवाईत एक पिस्तुल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आलं.


बांदीपोरात एक दहशतवादी ठार


बांदीपोरा जिल्ह्यात हाजिन परिसरातही चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. त्याच्याकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. 


एनआयएची कारवाई


जम्मू-काश्मिरमध्ये एनआयए (NIA) ची छापेमारी सुरु आहे. काश्मिरमध्ये गेल्या तीन दिवसात तीसहून अधिक ठिकाणी एनआईए ने छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान दोन टीआरएफ कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. जम्मू-काश्मिर पोलिसांनीही श्रीनगर शहरातील संवेदनशील भागात हाय अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच दिवसात अनेकांच चौकशी करण्यात आली असून काही जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.