ISKON Bans Amogh Lila Das: इस्कॉन (ISKON) मंदिर सोसायटीशीसंबंधीत स्वामी अमोघ लीला दास (Amogh Lila Das) यांनी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) आणि गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने ते अडचणीत आले आहेत. मंगळवारी इस्कॉन मंदिराने अमोघ लीली दास यांनी केलेल्या विधानासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकामध्ये स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासंदर्भात अमोघ लीला दास यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना एका महिन्यासाठी निलंबित केलं जात असून त्यांच्यावर महिन्याभराची बंदी घालण्यात येत असल्याचं इस्कॉनने स्पष्ट केलं आहे.


नेमकं काय म्हणाले स्वामी अमोघ लीला दास?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्कॉनशीसंबंधित स्वामी अमोघ लीला दास यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्वामी अमोघ हे स्वामी विवेकानंद यांच्या मासे खाण्याच्या निर्णयासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये स्वामी अमोघ लीला दास यांनी 'एक सिद्धपुरुष कधीच अशाप्रकारे कोणत्याही प्राणाला नुकसान पोहोचवत नाही,' असं म्हणताना दिसत आहेत. प्रवचनादरम्यान अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख करत मासे खाण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे. "प्राण्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं सेवन सिद्धपुरुष करत नाही," असं स्वामी अमोघ लीला दास सांगतात. "एखादा दिव्यपुरुष कोणत्याही प्राण्याला मारुन खाईल का? तो कधी मासे खाईल का? माश्यालाही वेदना होतात. विवेकानंदांनी मासे खाल्ले तर सिद्धपुरुष मासे खाऊ शकतात असं म्हणून शकतो का? नाही म्हणून शकत. सिद्धपुरुषाच्या हृदयामध्ये करुणा असते," असं स्वामी अमोघ लीला दास यांनी म्हटलं आहे.


रामकृष्ण परमहंस यांच्या विधानावरही बोलले


स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या 'जातो मत, तातो पथ' म्हणजेच जितके विचार, तितके मार्ग या विचारावरही स्वामी अमोघ लीला दास यांनी मत व्यक्त केलं. प्रत्येक रस्ता एकाच ठिकाणी जात नाही, असं रामकृष्ण परमहंस यांच्या विचाराबद्दल बोलताना स्वामी अमोघ लीला दास म्हणाले.


त्यांना समज नसल्याचा खेद


स्वामी अमोघ लीला दास यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या विधानाला विरोध केला. यानंतर इस्कॉनने स्वामी अमोघ लीला दास यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. स्वामी अमोघ लीला दास यांनी केलेलं विधान चुकीचं आणि स्वीकारता येणार नाही असं आहे. तसेच या दोन महान व्यक्तींच्या महान विचारांबद्दल स्वामी अमोघ लीला दास यांना योग्य समज नसल्याचं जाणून दु:ख झालं. इस्कॉन त्यांच्यावर एका महिन्याची बंदी घालत आहे, असं इस्कॉनकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.



लगेच सार्वजनिक जीवनातून दूर होणार


तसेच इस्कॉनने या पत्रकामध्ये स्वामी अमोघ लीला दास यांनी या विधानाबद्दल माफी मागितली होती असाही उल्लेख केला आहे. स्वामी अमोघ लीला दास यांनी गोवर्धन येथील डोंगरामध्ये एका महिन्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी जाण्याचा संकल्पही केला होता. ते तातडीने स्वत:ला सार्वजनिक जीवनातून दूर करतील असंही इस्कॉनने म्हटलं आहे.