चेन्नई : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं चांद्रयान-२ मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केलाय. चंद्रावर देशातील दुसरं स्पेसक्राफ्ट असणाऱ्या चांद्रयान-२ नं आज सकाळी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. इस्रोनं या संदर्भात माहिती दिलीय. चांद्रयान-२ वर लावण्यात आलेल्या दोन मोटरींना सक्रीय करण्यात आल्यानंतर या स्पेसक्राफ्टनं चंद्राच्या कक्षेत सहज प्रवेश केला. मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० वाजल्याच्या दरम्यान चांद्रयान - २ च्या तरल रॉकेट इंजिन सोडून हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल करण्याची मोहिम फत्ते करण्यात आली.   



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान -२ ला कठोर आव्हानांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे आज सर्वांचच लक्ष चांद्रयान-२ कडे लागलेलं आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे यान ३१ ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती फिरत राहणार आहे. त्यानंतर ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.   


चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर चांद्रयान-२ इस्रो स्पेसक्राफ्टच्या दिशेत चार वेळ परिवर्तन करणार आहे. २१, २८, ३० ऑगस्ट तसंच १ सप्टेंबर रोजी हे दिशा परिवर्तन करण्यात येतील. त्यानंतर चंद्राच्या ध्रुवाहून प्रवास करत जवळपास १०० किलोमीटरच्या अंतरावर चांद्रयान-२ आपल्या अंतिम कक्षेत दाखल होईल. यानंतर विक्राम लँडर २ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ हून विलग होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येईल.