राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या आधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेचे नवे फोटो शेअर केले आहेत. यामुळे चांद्रयान 3 मोहिम एका वेगळ्या बाजूने पाहण्याची संधी मिळत आहे. इस्रोने अनेक फोटो शेअर केले आहेत. नव्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोहिमेचे वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. ज्यामद्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोने प्रज्ञानच्या डाव्या आणि उजव्या NavCam (नेव्हिगेशन कॅमेरा) चे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा तयारीत होतं. @Astro_Neel या एक्स अकाऊंटवर हे फोटो एकत्र करत तयार केलेला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


रोव्हर फोटोंव्यतिरिक्त इस्रोने विक्रमवर बसलेल्या लँडर इमेजर कॅमेऱ्यामधून टिपण्यात आलेले व्हिडीओही शेअर केले आहेत. या फोटोंमधून चंद्रावर लँडिंग होताना स्पेसक्राफ्ट कशाप्रकारे चंद्राजवळून जात होतं हे दिसत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात अंतिम लँडिंग करण्यासाठी चांद्रयान-3 चे स्थान निश्चित करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा होता.



इस्रोने विक्रमच्या टर्मिनल डिसेंट आणि लँडिंग सीक्वेन्सचीही माहिती दिली आहे. या फोटोंमधून 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग पूर्ण करण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देत आहेत. 



चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याची तयारी करत असतानाच हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ मोहीमेतील मैलाचा दगड ठरली आहे. यासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अशी कामगिरी करणारा पहिला देश ठरला.


चांद्रयान-3 च्या यशाने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. तसंच या मोहिमेमुळे भारताने जगाला दक्षिण ध्रुवीय भागातील डेटाही उपलब्ध करुन दिला आहे.