मुंबई : अंतराळात मानवी सफरीच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन केंद्रानं अतिशय महत्वाचं यश मिळवलंय. मानवी मिशनसाठी अत्यावश्यक असणाऱ्या क्रू एस्केप सिस्टिमची चाचणी यशस्वी झाली आहे. अंतराळात माणूस पाठवण्यासाठी यानासोबत ही यंत्रणा अत्यावश्यक आहे. इस्त्रोनं तयार केलेल्या यंत्रणेत यान पृथ्वीवरुन अवकाशाकडे झेपावल्यावर लगेच अपघात झाला तर प्रवाशांना घेऊन जाणारा यानाचा भाग लगेच वेगळा होणार आहे. त्यानंतर शेकडो पॅरेशूटच्या मदतीनं यानात असलेले प्रवासी बाहेर पडू शकतील.


अंतराळात प्रवासासाठी पाठवण्यात येणाऱ्या यानामध्ये अनेक अत्यंत ज्वलनशील पदार्थ असतात. त्यामुळे मानवी जिवाला सर्वाधिक धोका असतो. म्हणूनच क्रू एस्केप यंत्रणा मानवी सफरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. इस्त्रोनं या यंत्रणेची यशस्वीपणे चाचणी केल्यानं आता भारतच्या मानवी अंतराळ मोहिमेच्या यशाच्या दृष्टीनं एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे.