AIS App : करदात्यांसाठी आनंदाची बातमी; आयकर विभागाने सुरु केली खास सुविधा
Income Tax AIS App : तुम्हीही दरवर्षी कर भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करदात्यांसाठी आयकर विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे.
Income Tax AIS App : आयकर विभागाने करदात्यांसाठी नवीन मोबाईल अॅप लाँच (AIS mobile app) केले आहे. या अॅपद्वारे करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह (TDS) वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) पाहता येणार आहे. यासोबत करदात्यांना कर कपात, कर संकलन, व्याज, लाभांश आणि शेअर याबद्दल सर्वसमावेशक माहिती मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना त्यावर मत मांडण्याचा पर्यायही मिळणार आहे. आयकर विभागाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
अॅपमध्ये दाखवलेल्या माहितीनुसार फीडबॅक देण्याचा पर्याय आणि सुविधाही करदात्याकडे असणार आहे. 'करदात्याचे काम सुलभ करणे आणि अधिक चांगली सेवा देण्याच्या क्षेत्रात आयकर विभागाचा हा आणखी एक उपक्रम आहे, असे आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या मोबाईल अॅपद्वारे करदाते वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS)/Taxpayer Information Statement (TIS) मध्ये उपलब्ध माहिती पाहू शकतील. 'करदातों के लिए AIS' (AIS for Taxpayers) हे मोबाईल ऍप्लिकेशनचे नाव आहे. हे अॅप आयकर विभागाकडून मोफत दिले जाते आणि ते Google Play आणि App Store वर उपलब्ध आहे.
अॅप कसे डाऊनलोड कराल?
* आधी Google Play Store वर जा
* सर्च ऑप्शनमध्ये AIS for Taxpayers टाइप करा
* त्यानंतर आता हे अॅप डाऊनलोड करा
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने निवेदनात म्हटले आहे की, " या अॅपचा उद्देश करदात्याला AIS/TIS बद्दल माहिती देणे आहे. हे करदात्यांशी संबंधित विविध स्त्रोतांकडून गोळा केलेली माहिती देते."