नवी दिल्ली: व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवरही तापला आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न करता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत घेणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार किंवा नाही, याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत भूमिका मांडणा-या भाजप नेत्यांचा इगो


या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटले की, कोविड-१९ ची साथ असताना परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल. विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचे म्हणणे ऐकायला पाहिजे. IIT आणि महाविद्यालयांनी परीक्षा रद्द करून आपल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले आहे. मात्र, आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. UGC ने देखील विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्रातील गुणांच्याआधारे त्यांना प्रमोट केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

यूजीसीच्या याच भूमिकेमुळे महाराष्ट्रातही केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. युजीसीला परीक्षा घ्यायच्याच होत्या तर कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना तसे सांगायला हवे होते. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये कोविडच्या उपचारांसाठी वापरली जात आहेत. मग परीक्षा घ्यायच्या कशा, असा सवाल राज्य सरकारने उपस्थित केला होता. 



यासंदर्भात राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पत्र लिहले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेते परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.