Italian Woman Ruckus in Vistara Flight: गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये प्रवाशांकडून गोंधळ घातला जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही घटनांमध्ये विमान कंपन्यांकडून नियमांचं उल्लंघन झालं असून, काही वेळा प्रवाशांनी विमानात मारहाण केल्याची, वाद घातल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आता आणखी एका घटनेचा समावेश झाला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 45 वर्षीय महिलेला क्रू मेंबरला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. महिलेची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. महिला मूळची इटलीची आहे. महिलेला 25 हजारांचा दंड ठोठावत जामीन मंजूर करण्यात आला. 


महिला प्रवाशाने क्रू मेंबरच्या तोंडावर मारली बुक्की


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

45 वर्षीय महिलेवर आरोप आहे की, तिने अबु धाबी (Abu Dhabi) येथून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या (UK 256) क्रू मेंबरला बुक्की मारली आणि अन्य एका मेंबरच्या तोंडावर थुंकली. कर्मचाऱ्याने यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली. 


सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "पाओला पेरुशियो असं महिला प्रवाशाचं नाव आहे. महिला मद्यधुंद अवस्थेत होती. त्याच अवस्थेत महिला आपली सीट सोडून बिझनेस क्लासमधील सीटवर जाऊन बसली. क्रू मेम्बरने रोखलं असता महिलेने तोंडावर मुका मारला. दरम्यान दुसऱ्या क्रू मेंबरने रोखण्याचा प्रयत्न केला असता महिला तोंडावर थुंकली आणि कपडे काढून विमानात फिरु लागली".


पोलिसांच्या माहितीनुसार, "महिला प्रवाशी क्रू मेंबर्सना शिव्या देत होती. यानंतर कॅप्टनने दिलेल्या निर्देशानुसार, महिला प्रवाशाला रोखण्यात आलं आणि कपडे घालण्यात आले. यानंतर तिला सीटला बांधून ठेवण्यात आलं. विमान लँड होईपर्यंत महिलेला तसंच ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंत पासपोर्टही जप्त केला होता. महिलेला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान तिला जामीन मिळाला आहे".


25 हजारांचा दंड


डीसीपी (Zone VIII) दीक्षित गेदाम यांनी सांगितलं की, तपास पूर्ण झाल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये विमानातील कर्मचारी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. प्राथमिक तपासात महिला प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत होती असं दिसत असल्यांचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, विमानात नेमकी काय घटना घडली याची पूर्ण माहिती पोलीस घेत आहेत. 


विस्ताराचे केबिन क्रू मेंबर एल एस खान यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर महिलेने हल्ला केला होता. दरम्यान 25 हजारांचा दंड ठोठावत महिलेला जामीन मंजूर करण्यात आला.