मोदी म्हणतात, देश-विदेशातील गुंतवणुकदारांसाठी सर्वोत्तम संधी हीच...
`या सिस्टममुळे देशात सर्वात मोठा टॅक्स रिफॉर्म शक्य`
देहरादून : उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्तराखंड गुंतवणूक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पाठ थोपटून घेतलीय. आम्ही टॅक्स सिस्टिममध्ये सुधारणा केल्यात. या नव्या सिस्टममध्ये कारभार जास्त पारदर्शी आणि सुलभ करण्यावर काम सुरू आहे. देश - विदेशातील गुंतवणुकदारांसाठी भारतात सर्वोत्तम वातावरण आहे... त्यामुळे गुंतवणुकीची हीच योग्य संधी आहे, असं यावेळी मोदींनी म्हटलंय.
देशात बँकिंग सिस्टम आणखी मजबूत केल्यानं व्यापाऱ्यांसाठी चांगलं वातावरण देशात तयार झालंय. आयुष्मान भारत योजनेमुळे मेडिकल क्षेत्रातही गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्यात. या योजनेमध्ये टाईप-२ आणि टाईप-३ शहरांत हॉस्पिटल बनवले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसार, १० हजारांहून जास्त कायद्यामध्ये बदल करण्यात आले... तर चौदाशे हून जास्त कायदे संपवण्यात आलेत. हे कायदे इंग्रजांच्या काळापासून बनवण्यात आले होते... परंतु आजच्या काळात मात्र ते निकामी होते. जीएसटी सिस्टम ही सरकारसाठी एक मोठा निर्णय आहे... या सिस्टममुळे देशात सर्वात मोठा टॅक्स रिफॉर्म शक्य झालाय.
देशात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगानं सुधारणा होत आहेत. दररोज २७ किमी राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती होतेय. वेगवेगळ्या शहरांत मेट्रोचा विस्तार सुरू आहे. देशातील ४०० रेल्वे स्टेशन अतिआधुनिक बनवणं सुरू आहे. त्यामुळे भारतात गुंतवणुकदारांसाठी ही फायदेशीर संधी ठरू शकते, असंही मोदींनी सुचवलंय.