उत्तर प्रदेश : १७ सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो आणि उत्तर प्रदेशातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबरला रविवार आहे. तरी देखील सर्व शाळा सुरु राहणार असून त्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात १.६० लाख प्राथमिक शाळा असून या सर्व शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री अनुपमा जैस्वाल यांनी दिली. शाळा दत्तक घेतलेल्या मतदारसंघातील आमदारांनी शाळांमध्ये उपस्थित राहावे. तसंच मोदींनी दिलेला स्वच्छेतेचा संदेश आणि त्याचे मह्त्त्वे विदयार्थ्यांना समजावून सांगावे, असेही त्यांनी सांगितले.  कारण स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमधे जनजागृती केल्यास मोदींचे  ‘स्वच्छ भारत’ चे स्वप्न पूर्ण होईल, असे त्या म्हणाल्या. मोदींसाठी वाढदिवसाची हीच मोठी भेट असेल, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात यावा, अशा सूचना देखील आमदारांना देण्यात आल्या आहेत. 


मोदी हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. मुलांससाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील बलशाली व्यक्ती आहेत, असे भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितले. स्वच्छतेचा प्रसार आणि मुलांमध्ये त्याबाबत जागृती करणे हा शाळांमध्ये पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असेही ते म्हणाले.