संरक्षण समितीच्या बैठकीत कधीच सहभागी न झालेले सैन्यावर प्रश्न उपस्थित करताय : जे.पी नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत भाजपे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी म्हटलं की, वायनाडचे खासदार संरक्षण संदर्भातील संसदेच्या स्थायी समितीच्या एकही बैठकीत सहभागी न होणारे, मात्र देशाचे खच्चीकरण आणि लष्कराच्या सामर्थ्यावर प्रश्न उपस्थित करण्याचं काम करत आहेत.
राहुल गांधी हे संसदेच्या स्थायी समितीच्या एकही बैठकीला उपस्थित नसल्याच्या बातमीनंतर नड्डा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पण काँग्रेसकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही.
नड्डा यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर अतिशय कठोर शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, राहुल गांधी हे त्या गौरवशाली वंश परंपरेतून आहेत ज्यांना संरक्षण समिती नाही तर कमीशन महत्त्वाचं वाटतं. काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत. ज्यांना संसदीय कामकामाजी चांगली माहिती आहे. पण शाही परिवारातील लोकं अशा नेत्यांना कधी पुढे येऊ देत नाहीत.'
राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका करत आहेत. लडाख सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असताना त्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.