Shilpa Jharia case : मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये मेखला रिसॉर्टमध्ये (Mekhla Resort) 10 दिवसांपूर्वी एका तरुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला राजस्थानमध्ये अटक केली आहे. तरुणीच्या प्रियकरानेच तिची हत्या केली होती. हत्येनंतर या तरुणीसोबत एक व्हिडीओही प्रियकराने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर जबलपूर पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने मेखला रिसॉर्ट हत्याकांडातील आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4000 किलोमीटरपर्यंत आरोपीचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी शिल्पा झरियाच्या हत्येचा व्हिडिओ शूट करणाऱ्या आरोपी अभिजीत पाटीदारला अटक केली. मात्र या आरोपीचे खरे नाव हे हेमंत भदाणे असल्याचे समोर आले आहे. हेमंत भदाणे हा महाराष्ट्रातील नाशिक येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तरुणीचा मोबाईल, एटीएम कार्ड, चेन, नाकातील रिंग जप्त केली आहे.


आरोपी हेमंतने शिल्पा झरिया हिच्या एटीएम कार्डमधून वेगवेगळ्या शहरात 1 लाख 52 हजार 450 रुपये काढले होते. जबलपूरचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले की, आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे हुशारीने तो प्रत्येक शहरात 5 तास थांबल्यानंतर आपले ठिकाण बदलायचा. आरोपी राजस्थानहून हरियाणाच्या रेवाडी, हिमाचल प्रदेश चंदीगडमार्गे दिल्लीमार्गे अजमेरला पोहोचला होता. गेल्या 10 दिवसांपासून हेमंतने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असा सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी तो हत्या केलेल्या प्रेसयीच्या एटीएममधून पैसे काढत होता. पण हेमंतने अजमेरमध्ये आल्यावर एटीमधून 20 हजार रुपये काढले. यानंतर जबलपूर पोलिसांनी अजमेर पोलिसांना याची माहिती दिली आणि नाकेबंदी सुरु केली. वाहनांची तपासणी करताना हेमंत पोलिसांच्या हाती लागला.