जयपूर : राजस्थानमधील भिलवाडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चार महिन्यांच्या चिमुकलीला उपचाराच्या नावावर चक्क गरम लोखंडाने चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. 


पोलीस अधिकारी सुनिल चौधरी यांनी सांगितले की, रामाखेडा गावात राहणाऱ्या चार महिन्यांच्या नंदिनीची प्रकृती बिघडल्याने तिला भीलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांना नंदिनीच्या पोटावर गरम लोखंडाने चटके दिल्याचं उघडकीस आलं.


पीडित नंदिनीला गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्याऐवजी गरम लोखंडाने पोटावर चटके देण्यात आले. हा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा आहे. उपचार करण्याच्या नावावार पीडित चिमुकलीला गरम चटके देण्यात आले आहेत.


महात्मा गांधी रुग्णालयाचे डॉक्टर ओ पी आगल यांनी सांगितले की, पीडित नंदिनीला निमोनिया झाला आहे. तिच्यावर उपचार करण्याऐवजी अंधश्रद्धाळुंनी गरम लोखंडाने चटके दिले.


या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.