नवी दिल्ली : जयराम ठाकूर २७ डिसेंबरला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल आचार्य देव व्रत यांनी शपथविधीसाठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचलमध्ये भाजपने बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर बऱ्याच चर्चा सुरु होत्या. पण भाजपने आज घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाची घोषणा करत जयराम ठाकूर यांचं नाव जाहीर केलं. या शपथविधी सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.


जयराम ठाकुर हिमाचल प्रदेशमधून ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1998 मध्ये पहिल्यांदा ते आमदारा म्हणून निवडून आले होते.


निवडणुक प्रचारादरम्यान पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रेम कुमार धूमल यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली होती पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने मुख्यमंत्री कोणाला करायचं याबाबत भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.


केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना हिमाचलमध्ये पाठवण्याचा विचार देखील सुरु होता. पण आता ते केंद्रामध्येच मंत्री म्हणून राहणार आहेत. आज झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यावर याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज्यातील खासदार देखील उपस्थित होते.