Jama Masjid चं महिलांविरोधात तुघलकी फर्मान, एकट्या महिलेला प्रवेश बंदी
दिल्लीच्या ऐतिहासिक Jama Masjid च्या गेटवर एकट्या महिलांसाठी No Entry चा बोर्ड, आदेशाविरोधात राजकीय वातावरण तापलं, दिल्ली महिला आयोगानेही घेतली गंभीर दखल
Single Women entry ban in Jama Masjid : दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीत एकट्या महिला किंवा मुलींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मशिदीच्या प्रवेश द्वारावर एकट्या महिलांना नो एन्ट्रीचा बोर्ड लावण्यात आला आहे. जामा मशिदीत एकटी मुलगी किंवा महिलेला येता येणार नाही. या निर्णायाविरोधात आता राजकारण तापलं आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या आदेशाचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. (Chairperson Of Delhi Commission for Women Swati Maliwal Issuing Notice to Jama Masjid Imam)
जामा मशिदीच्या इमामांना नोटीस पाठवणार
दिल्ली महिला आयोगाने जामा मशिदीच्या (Jama Masjid) इमामांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाती मालिवाल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, जामा मशिदीत एकट्या महिलेला प्रवेश बंदीचा निर्णय चुकीचा आहे. पुरुषांना जितका अधिकार आहे तितकाच अधिकार महिलांनाही आहे. मी जामी मशिदीच्या इमाम यांना नोटीस जारी करत आहे. महिलांना प्रवेश बंदीचा अधिकार कोणालाही नाही, असं स्वाती मालिवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मशिदीच्या शाही इमाम यांनी काय म्हटलंय
जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी (Shahi Imam Ahmed Bukhari) यांनी या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही मुली आपल्या प्रियकरांबरोबर मशिदीत येत असल्याची काही तक्रार आमच्याकडे आल्या होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय, तसंच महिलांना जामा मशिदीत यायचं असेल तर त्यांना आपला पती किंवा कुटुंबाबरोबर यावं लागेल. नमाज पढण्यासाठी येणाऱ्या महिलांना बंदी नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा : शिंदे गटाचं पुन्हा 'काय झाडी, काय डोंगार....' गुवाहाटी दौऱ्यासाठी 180 सीटर विमान बूक
निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया
काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही जामा मशिदीच्या या आदेशाचा विरोध केला आहे. भारतात प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या शहनाज अफजल यांनी म्हटलंय. असे आदेश काढणं म्हणजे संविधानचं उल्लंघन करण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रवक्ते शाहिद सईद यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. ही चुकीची मानसिकता असल्याचं त्यांनी म्हटलंय, तसंच महिलांना दुय्यम दर्जा दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.