मुंबई : मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांनी अय़ोध्येच्या वाद्ग्रस्त प्रकरणातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. असदुद्दीन ओवेसी यांनी निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केलीय तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं फेरविचार याचिकेचा विचार सुरू केलाय. त्याच वेळी सुन्नी वक्फ बोर्डानं मात्र या निकालाचं स्वागत करून वाद संपवण्याचं आवाहन केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येच्या निकालानंतर विविध समाजांच्या काय प्रतिक्रिया येतात, याची उत्सुकता आणि चिंता देशाला होती. वादग्रस्त जमीन संपूर्णतः रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर मुस्लिम समुदायाच्या बहुतांश नेत्यांनी स्वागत केलं असलं तरी काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही निकालाबाबत नापसंती व्यक्त केली. तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष जफरयाब जिलानी यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत चाचपणी करणार असल्याचं सांगितलं.  


मात्र, या खटल्यात पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूखी यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलं. ओवेसी हे बोर्डाचे सदस्य नाहीत. कुणी फेरविचार याचिकेची भाषा करत असेल, तर त्याचा सुन्नी वक्फ बोर्डाशी काहीही संबंध नाही, असं फारुखी म्हणाले. 


तर दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. आता फेरविचार याचिकेची गरज नसून हा वाद आता मिटला पाहिजे, असं ते म्हणाले. 


निकालानंतर काही नेते, संस्थांनी नाराजी व्यक्त केली असली तरी मुस्लिम समाजानं हा निर्णय मोकळ्या मनानं स्वीकारलाय. मुस्लिम धर्मगुरू, नेते आणि समाजानं घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह आहे.