नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act)पूर्वोत्तर राज्य आणि पश्चिम बंगालनंतर आता राजधानी दिल्लीतही आंदोलनाला हिंसक वळण लागलं. रविवारी सायंकाळी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चात हिंसाचार करत दिल्लीतील बस, खासगी वाहनं, दुचाकी जाळण्यात आल्या. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांवरही हल्ला करण्यात आला त्यापैकी दोन अग्निशमन दलातील कर्माचाऱ्यांना दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. यात ६ पोलीस जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले. अग्निशमन दलातील जवानांवर हल्ला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात अश्रूधुराच्या निळकांड्या फोडल्या. त्यानंतर विद्यापीठात घुसलेल्या आंदोलकांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांविरोधात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. मथुरा रोड, न्यू फ्रेंड्स कॉलनी, जामिया नगर आणि सराई जुलेना येथे जवळपास १००० निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात सहा बस आणि ५० हून अधिक वाहनांची जाळपोळ करण्यात आली.



जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आलेल्या ५० विद्यार्थ्यांना सोमवारी पहाटे सोडण्यात आले. त्यातील ३५ जणांना कालकाजी पोलीस ठाणे, उर्वरित एकाला न्यू फ्रेंड्स कॉलनीमधून सोडण्यात आले. दिल्लीतील हिंसाचारानंतर दिल्ली मेट्रोने ११ स्टेशनांवर मेट्रो सेवा बंद केली आहे. तर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.