Muslim Leaders Praise Amit Shah: रामनवमीनंतर जातीय हिंसाचार आणि प्रक्षोभक भाषणांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिष्टमंडळात जमैत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी (Jamiat Ulama-e-Hind president Maulana Mahmood Mad), सचिव नियाज फारुखी (secretary Niyaz Faruqui) आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कलम फारुखी (All India Muslim Personal Law Board members Kamal Faruqui), प्राध्यापक अख्तरुल (Professor Akhtarul Wasey) उपस्थित होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नियाज फारुखी यांनी देशासमोर असणाऱ्या 14 आव्हानांचा आम्ही उल्लेख केल्याचं सांगितलं. बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांवर बैठकीत चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं. 


"आम्ही ज्यांना भेटलो ते वेगळे अमित शाह आहेत. राजकीय भाषणांमधून दिसणाऱ्या अमित शाह यांच्यापेक्षा हे वेगळे आहेत. त्यांना सकारात्मकपणे आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांना सविस्तरपणे आमचं म्हणणं ऐकून घेतलं. ते अजिबाात नाकारण्याच्या मनस्थितीत नव्हते," असंही त्यांनी सांगितलं.


रामनवमीला काही राज्यांमध्ये जातीय सलोखा बिघडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बिगरभाजपा राज्यांची संख्या जास्त आहे. भाजपा सदस्यांनी आमच्या रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपानेच आपल्या राजकीय फायद्यासाठी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे. 


मुस्लीम नेत्यांनी यावेळी बिहारमधील नालंदा येथील हिंसाचारात मदरसा जाळण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसंच राजस्थानमधील भरतपूर येथे जुनैद आणि नासीर यांची हत्या झाल्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. गोरक्षकांनी 15 फेब्रुवारीला त्यांचं अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी जळालेल्या गाडीत त्यांचे मृतदेह आढळले होते. 


मुस्लीम नेत्यांनी यावेळी भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांचाही मुद्दा उपस्थित केला. "त्यांनी आम्हाला सांगितलं की, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असून प्रत्येकाला एकाच दृष्टीने पाहू नये. सरकार यामध्ये सहभागी नाही. आम्ही त्यांना तुम्ही शांत असल्याने यामुळे मुस्लिमांमध्ये निराशा असल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी लक्ष घालू असं आश्वासन दिलं," अशी माहिती फारुखी यांनी दिली आहे. 


"आम्ही कोणत्याही नेत्याला टार्गेट केलं नाही. ते आमचं ध्येय नव्हतं. सहकार्य करावं आणि देशातील परिस्थिती बदलावी असा आमचा प्रयत्न आहे," असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच यावेळी समलिंगी विवाह आणि समान नागरी कायदा या विषयांवरही चर्चा झाली. आम्ही आमची भूमिका मांडली, मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही अशी माहिती त्यांनी दिली. 


गृहमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर शिष्टमंडळ किती समाधानी आहे असं विचारण्यात आलं असता फारुकी यांनी सांगितलं की, "आम्ही पुढाकार घेतला आहे. सरकारच्या वतीने आम्ही काहीही बोलत नाही. अमित शाह यांनी आम्हाला जे उपदेश करतो ते मी आचरणात आणतो असं सांगितलं आहे. त्यामुळे जे होईल ते पाहूयात".