मुंबई: जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मोठा घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जम्मूमध्ये रविवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे हाती लागलेत. आतपर्यंत रायफल्स आणि ग्रेनेडनं हल्ले करणा-या अतिरेक्यांच्या हाती ड्रोन लागल्याचं स्पष्ट झालं असून ISI आणि पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मूच्या भारतीय वायुदलाच्या तळावर झालेला ड्रोन हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनीच केल्याचं समोर येतं आहे. मात्र त्यामुळे आता अतिरेक्यांचं नवं हत्यार उजेडात आलं असून सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी अधिक वाढली आहे. 
पहिलाच कट जरी त्यांचा अपयशी ठरला असला तरी आता चिंता वाढली आहे. यामागचं कारण असं की आता ड्रोन हल्ला करण्याची नवी आयडीया पाकिस्तानला मिळाली आहे. ही तर पहिली चाचणी होती अशा प्रकारचे हल्ले भविष्यातही होण्याचा धोका असल्यानं आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 


आतापर्यंत काश्मीरमधल्या अतिरेक्यांपर्यंत हत्यारं पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर होत होता. मात्र आता चक्क स्फोट घडवण्यासाठी अतिरेक्यांनी ड्रोन वापरलेत. 
दोन यूएव्ही वापरून Mi-17 हँगरजवळ स्फोटकं टाकण्यात आली. ही ड्रोन्स 5 किलोमीटर अंतरावरून लाँच झाली असावीत, असा अंदाज आहे. 


बेसपासून 14 किलोमीटरवर पाकिस्तानची सीमा आहे. तिथूनच ड्रोन्स नियंत्रित केलेली असू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरेक्यांचं मुख्य टार्गेट एअरबेसवरील लढाऊ हेलिकॉप्टर्स होती. मात्र त्यांचा नेम चुकल्यानं मोठं नुकसान टळलं. 


या ड्रोन्समध्ये IED आणि RDX स्फोटकं वापरण्यात आली होती. रडारवर सापडू नये, यासाठी लो फ्लाइंग ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानी लष्कर आणि  ISIचा वरदहस्त असल्याशिवाय अतिरेक्यांच्या हाती ड्रोन्स लागणं शक्य नाही.  जम्मू काश्मीरमध्ये हे नवं आव्हान असलं तरी भारतीय लष्कर त्याला तोंड देण्यासाठी समर्थ आहे.