जम्मू : पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी जम्मूमध्ये पुन्हा एकदा भडका उडेल, असा इशारा देत एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे राज्यपालांचं लक्ष वेधलं आहे. जम्मू आणि नजीकच्या परिसरातील गुज्जर आणि बक्करवाल या समाजाला विनाकारण निशाण्यावर आणलं जात असून, याकडे तातडीने लक्ष दिलं जाण्याची गरज असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष न दिल्यास त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील असा इशारा त्यांनी दिला. श्रीनगरमध्ये त्या बोलत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला गुज्जर आणि बक्करवाल समुदायाला निशाण्यावर घेतलं जात असून, आपलं सरकार पडल्यापासून ही परिस्थिती पाहायला मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकार पडल्यानंतर काहींना आपली राहती खरं सोडण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. आताही अतिक्रमणाच्या नावाखाली रहिवाशांना काही घरं सोडून जाण्यास सांगण्यात येत असल्याचं सांगत राज्यपालांनी ऐन थंडीच्या दिवसांमध्ये कोणावरच बेघर होण्याची वेळ येणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. 


सध्या परिस्थिती बदलली असून, अतिक्रमणाच्या नावाखाली आता मात्र ही आश्वासनं दूर राहिली असून, जनावरांच्या तस्करीच्या नावाखाली या स्थानिकांसमोर नव्या समस्या निर्माण केल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 




जम्मू भागामध्ये मुस्लिमांवर उघडपणे निशाणा साधला जात असून, हे सत्र असंच सुरू राहिल्यास १९४७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, असं सूचक विधान मुफ्ती यांनी केलं. सध्याच्या घडीला प्रशासनाने, राज्यपालांनी या संपूर्ण परिस्तितीकडे लक्ष द्यावं अन्यथा याचे गंभीर परिणाम समोर येतील ही बाब मुफ्ती यांनी लक्षात आणून दिली. जम्मूतील परिस्थितीविषयी त्यांनी केलेल्या या आरोपांनंतर आता, राज्यपाल यावर कोणती कारवाई करणार आणि जम्मूमधील परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने पावलं उचलली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.