श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम परिसरात रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या चकमकीत भारतीय लष्करातील एक मेजर जखमी झाल्याचे समजते. या चकमकीदरम्यान काही दहशतवादी पळून गेले. हे सर्वजण कुलगामच्या लोवरमुंडा परिसरात लपून बसले आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला असून सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याचे समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी काल रात्री गुडर येथे चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर भारतीय लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला. कालच्या कारवाईत लष्करासह सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनीही सहभाग घेतला होता.


प्राथमिक माहितीनुसार, काल संध्याकाळी अस्थल आणि चेहलान परिसरात राष्ट्रीय रायफल्सचे जवान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अचानकपणे हल्ला चढवला. भारतीय जवानांनी तात्काळ हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांचे विशेष कृती दल (SOG) पथकही त्याठिकाणी मदतीला आले. या दोन्ही दलांनी मिळून रात्री उशीरापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीदरम्यान एका मेजर पदावरील अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली. या अधिकाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.


गेल्या काही दिवसांमध्ये सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. भारतीय लष्कराने १ एप्रिलपासून आतापर्यंत २६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.



काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चौकीवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात CRPF चे तीन जवान शहीद झाले होते.