श्रीनगर : Jammu kashmir जम्मू काश्मीर येथील Handwara हंदवाडा परिसरात शनिवारी झालेल्या एका चकमकीमध्ये भारतीय सैन्यातील पाच जवानांना आपले प्राण गमावावे लागले. ज्यामध्ये एक कमांडिंग ऑफिसर, मेजर आणि दोन जवानांचा समावेश आहे. तर एकजण स्थानिक पोलीस दलातील कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंदवाडातील या घटनेमुळे सारा देश पुन्हा एकदा हळहळला. तोच या चकमकीमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या जीवनप्रसंगांविषयीची माहिती समोर येताच अनेकांच्याच काळजात धस्स झालं. याच हल्ल्यात शहीद झालेले मेजर अनुज सूद (३०) हे त्याच दिवशी जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीनतंर त्यांच्या घरी परतणार होते. 


मार्च महिन्यातच सूद यांनी जम्मू-काश्मीरमधील पोस्टींग पूर्ण केली होती. पण, लॉकडाऊनमुळे मात्र त्यांना तिथेच थांबावालं लागलं होतं. ते घरच्या वाटेने अशा अवस्थेत जातील याची पुसटशी कल्पनाही कोणाच्याच मनात नव्हती. महिन्याभराच्या सुट्टीसाठी येणारे मेजर सूद हे येत्या काळात गुरदासपूर येथे सैन्याच्या सेवेत रुजू होणार होते, अशी माहिती त्यांचे वडील निवृत्त ब्रिगे़डीयर सी.के.सूद यांनी दिली. त्यांनीसुद्धा काश्मीर प्रांतात देशसेवेत योगदान दिलं होतं. 


वाचा : शहीद शंकर सिंह यांचा आईसोबतचा हा ठरला अखेरचा संवाद


इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शनिवारी मेजर सूद यांचं त्यांच्या वडिलांशी अखेरचं संभाषण झालं. त्यावेळी आपण एका मोहिमेवर जाणार असल्याचं त्यांनी वडिलांना सांगितलं. ज्यानंतर आपण दोन शस्त्रधाऱ्यांचा सामना करत असल्याची माहितीही त्यांनी वडिलांना दिली होती. अवघ्या अडीच वर्षांपूर्वीच सूद यांचा विवाह झाला होता. 2017 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या मेजर सूद यांच्या पत्नीने हल्लीच त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. येता काळात त्यासुद्धा पतीसोबत गुरदासपूर येथे वास्तव्यास जाणार होत्या. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. 


मेजर अनुज सूद हे त्यांच्या कुटुंबातून तिसऱ्या पिढीच्या रुपात सैन्यदलाच्या सेवेत रुजू झाले होते. त्यांनी सैन्यात भरती होण्याऐवजी खासगी क्षेत्रातील नोकरी करावी असंच त्यांच्या वडिलांना वाटत होतं. पण, त्यांनी सैन्याचीच निवड केली. 


 


मेजर अनुज यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लवकर परत येण्याचं वचन देणारा अनुज परत येतोय खरा. पण, असा तिरंग्यामध्ये, असं म्हणत मेजर सूद यांच्या धाकट्या भावाच्या भावनांचा बांध फुटला. तर, 'कुछ कर के गया है वो; देश का बेटा था देश के नाम हो गया', असं म्हणत त्यांचे वडील ब्रिगेडीयर सूद मात्र आपल्या मुलाला गमावूनही या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला आधार देत आहेत. अशा या वीराला आणि त्याच्या तितक्याच धाडसी कुटुंबाला सलाम.