मोठी बातमी! काश्मीरमधील बांदीपोरामध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला
काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यात १ जवान शहीद झाला आहे
JK Terrorists Attack : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा इथं दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. तर एक SPO शहीद झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आहे.
जम्मू-काश्मीर पोलीस (JK Police) आणि भारतीय लष्कराने (Indian Army) गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे दहशतवादी चिडले असून त्यांनी छुप्या पद्धतीने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनांवर ग्रेनेड हल्ला केला जात आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी घटना
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 4 दिवसांपूर्वी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की, 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यापासून 439 दहशतवादी मारले गेले आहेत. तर 541 चकमकीत 109 सुरक्षा जवान शहीद झाले.
या घटनांमध्ये 98 नागरिकांचाही मृत्यू झाला आणि सुमारे 5.3 कोटी रुपयांच्या वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान झालं आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी दिली आहे.