काश्मीरमधील राजौरी सेक्टर येथे स्फोट, एक मेजर शहीद
काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये आयईडी स्फोटात एक मेजर शहीद झाला आहे.
जम्मू : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचे दिसून येत आहे. नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात लष्काराचा एक वरिष्ठ अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू -काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये आयईडी स्फोटात एक मेजर शहीद झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ राजौरी क्षेत्रात हा स्फोट झाला. यात स्फोटात लष्कराचे अधिकारी शहीद झालेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण कक्षाच्या आत १.५ किलोमीटर अंतरावर स्फोटके पेरुन ठेवण्यात आली होती. नियंत्रण रेषेजवळ पाहणी करताना या स्फोटकांचा स्फोट झाला. दरम्यान, नौशेरा सेक्टरमध्ये विस्फोटके निकामी करताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झालेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.