श्रीनगर : जम्मू - काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांपूर्वीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याची माहिती समोर येत आहे. श्रीनगर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जप्त करण्यात आलेल्या विस्फोटकांमध्ये जेलेटिन रॉइड, नायट्रिक ऍसिड, जॅकेट्स, पिस्तुल आणि दारुगोळ्याचा समावेश आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या पाच जणांमध्ये एहजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, साहिल फारुक गोजारी, नासिर अहमद मीर आणि इम्तियाज अहमद चिकला यांचा समावेश आहे. 


काही दिवसांपूर्वीच श्रीनगरपासून काही अंतरावर असणाऱ्या हब्बाक क्रॉसिंग येथे एका संशयित दहशतवाद्याने सीआरपीएफच्या चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. पण, चौकीऐवजी काही अंतरावर, रस्त्यावरच ग्रेनेड पडला. या हल्ल्यात काहीजण जखमीही झाले होते. हल्ल्यानंतर तपासणीदरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दहशतवाद्यांची माहिती मिळाली. पुढे पोलिसांनी ही कारवाई केली. 



पाहा उणे ४० अंश तापमानात भारतीय सैन्यातील जवान कसं करतात देशाचं रक्षण


सर्वप्रथम पोलिसांनी एहजाज अहमद शेख आणि उमर हमीद शेख यांना अटक केली. ज्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. ग्रेनेड हल्ला घडवून आणल्याची बाब त्या दोघांनीही स्वीकारली. शिवाय २६ नोव्हेंबरला काश्मीर विद्यापीठाजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही आपण सहभागी असल्याची कबुली त्यांनी दिली. या दोन्ही दहशतवद्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी तिघांनाही ताब्यात घेतलं. येत्या काही दिवसांमध्ये प्रजासत्ताक दिन असल्यामुळे यादरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घ़डवून आणण्याचा कट असल्याची बाब यातून उघड झाली. दरम्यान, पुढील काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त दिसणार आहे.