जया वर्मा यांची रेल्वे बोर्डाच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जया वर्मा यांना रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान मिळाला आहे. जया वर्मा या अनिल कुमार लाहोटी यांची जागा घेणार आहेत. उद्या म्हणजेज 1 सप्टेंबरला त्या पदभार स्वीकारणार आहेत. सध्या जया वर्मा रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंटच्या सदस्य आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यासाठी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी रेल्वे चौघांची एक समिती तयार करण्यात आली होती. याच समितीने जया वर्मा यांना अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेत त्यावर सहमती दर्शवली. जया वर्मा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या पदावर असणार आहेत. 


ओडिशामधील कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेनंतर जया वर्मा यांनी सरकारला दुर्घटनेबद्दल सर्व माहिती दिली होती. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात या दुर्घटनेसंबंधी पॉवर प्रेझेंटेशन केलं होतं. दुर्घटनेदरम्यान जया वर्मा यांनी केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. 



जया वर्मा यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत


जया वर्मा यांनी अलाहाबाद विद्यापिठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 1988 मध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये (IRTS) त्या सहभागी झाल्या. जया वर्मा सध्या रेल्वे बोर्डात सदस्य, ऑपरेशन्स आणि बिजनेस डेव्हलपमेंट पदावर काम करत होत्या. याशिवाय जया वर्मा यांनी दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक, पूर्व रेल्वे आणि उत्तर रेल्वेमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणूनही काम केलं आहे.


जया वर्मा ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात चार वर्षे सल्लागार म्हणून नियुक्त होत्या. कोलकाता ते ढाका धावणारी मैत्री एक्स्प्रेस जया वर्मा यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती.


केंद्र सरकारने भारतीय रेल्वेला विक्रमी बजेट दिलेलं असतानाच जया वर्मा सूत्रं हाती घेणार आहेत. केंद्र सरकारने 2023-24 मध्ये भारतीय रेल्वेला 2.74 लाख कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प दिला आहे. रेल्वेला दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे. विजयालक्ष्मी विश्वनाथन या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्या होत्या.