बंगळुरू : भाजपचे अडीच दिवसांचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडल्यानंतर आता कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी करत सत्ता स्थापन करण्यासाठी पाऊल  पुढे टाकलंय. कर्नाटकामध्ये आठवड्याभरात दुसरा शपथविधी सोहळा रंगणार आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर एच.डी. कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत... दरम्यान, जेडीएस आणि काँग्रेस यांच्यातील सत्तावाटपाचं सूत्रंही ठरलंय. 


सत्तावाटपाचं सूत्र... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मुख्यमंत्री जेडीएस तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहणार आहे


- मुख्यमंत्री पदाची माळ जेडीएसच्या कुमारस्वामींच्या गळ्यात पडणार आहे... अपेक्षेप्रमाणे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागलीय. कुमारस्वामी यांच्यासह जी. परमेश्वर यांचाही शपथविधी आजच पार पडणार आहे 


- जेडीएसला मुख्यमंत्रिपद आणि ११ मंत्रीपदं तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आणि २१ मंत्रिपदं आली आहेत


- विधानसभा पद काँग्रेसकडे आलंय... विधानसभेच्या सभापतीपदी काँग्रेसचे के. आर. रमेशकुमार यांची निवड करण्यात आलीय


- विधानसभा उपाध्यक्षपद जेडीएसकडे राहणार आहे... हे पद वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तीला दिलं जाण्याची शक्यता आहे


थपथविधीसाठी भाजपविरोधी एकत्र...


शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी चिकमंगळुरच्या शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. एच डी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजपविरोधी पक्षांचे नेते बंगळुरूत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी बंगळुरूत दाखल झाले आहेत. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. डीएमकेचे नेते स्टॅलिनही शपथविधीला हजेरी लावणार आहेत. प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणासाठी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते शपथविधीला आले असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिलीय. 


एकीकडे जेडीएस-काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असताना भाजप मात्र निषेध आंदोलन करणार आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरुमध्ये काळे झेंडे घेऊन भाजप नेते आणि कार्यकर्ते जेडीएस-काँग्रेसविरोधात आंदोलन करतील.