शिवसेनेची मनधरणी करताना भाजपचा आणखी एक मित्र नाराज
एकीकडे शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपचा आणखी एक मित्र नाराज झाला आहे.
नवी दिल्ली : एकीकडे शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपचा आणखी एक मित्र नाराज झाला आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतायत. तर दुसरीकडे एनडीएमध्ये सहभागी असलेल्या जनता दल युनायटेडनं नाराजीचा सूर लावलाय. एनडीएतले घटकपक्ष नाराज आहेत. जेडीयूला रोज नवनव्या पद्धतीनं छळलं जातंय. बिहारमध्ये भाजपला उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रीपदं दिली. पण केंद्र सरकारमध्ये अजूनही जेडीयूला प्रतिनिधीत्व दिलेलं नाही, अशा शब्दांत जेडीयूचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी नाराजी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीचे निकाल पाहता भाजपला आगामी लोकसभा निवडणूक अवघड असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.