नवी दिल्ली : देशभरात निवडणुकीचे वारे घोंघावत असताना यावर दहशतवादाचे सावट असल्याचेही समोर येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शामली आणि उत्तराखंडच्या रुडकी रेल्वे स्थानकांवर मिळालेल्या पत्रांमधून ही धमकी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेने ही धमकी गांभीर्याने घेतली आहे. या धमकीमागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिवे मारण्याची धमकी समोर आल्यानंतर निवडणूक आयोगातर्फे योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन रेल्वे स्थानकांतून धमकीची पत्रे मिळाली. याव्यतिरिक्त उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे रेल्वे स्थानक आणि मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येतील राम जन्मभूमी देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा या पत्रांचा तपास करत आहेत. 



धमकी मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  दोन स्थानकांवर धमकीचे पत्र मिळाल्याचे वृत्त उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनी कबुल केले आहे. 21 एप्रिलला जैशचा विभाग कमांडरने हे पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पत्रांचे अक्षर सारखे असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.