Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून शहरात पूर आला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल सगळं काही पाण्याखाली आलं आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि सतत पाऊस सुरु असल्याने स्थिती आणखीनच गंभीर होऊ लागली आहे. शहरांमध्ये पाणी साचत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. जेट एअरवेजचे माजी सीईओ संजीव कपूर यांनी ही तुलना चुकीचं असल्याचं म्हटलं असून याचं कारणही सांगितलं आहे. 


आनंद महिंद्रांची पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी दुबईतील पूरस्थिती दर्शवणारा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'नाही, मुंबई नाही दुबई आहे'. यावर संजीव कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबई अशा वादळी पावसाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली नाही. ज्याप्रमाणे बर्फवृष्टीची सवय असलेली शहरं डिझाऊन करण्यात आली आहे असं संजीव कपूर म्हणाले आहेत. 


संजीव कपूर यांनी म्हटलं आहे की, "चुकीची तुलना आहे. दुबई अशा पावसांचा सामना करण्यासाठी उभारण्यात आलेली नाही. पाऊस ज्यामुळे शहरं जलमय होतील. यापेक्षा तुलना करायची असेल तर मुंबईत जोरदार बर्फवृष्टी झाली तर अशी होऊ शकते. मुंबई अशा बर्फवृष्टीचा सामना करेल अशा पद्धतीने उभारण्यात आलेली नाही. बर्फाळ ओस्लोमधील लोक मुबंईची थट्टा करतील का?".



दरम्यान संजीव कपूर यांनी आनंद महिंद्रांना दुबईवर टीका करण्याच्या हेतूने ही पोस्ट केली नसावी असंही स्पष्ट केलं आहे. तथापि, दुबईच्या पायाभूत सुविधा उभारताना पावसाचा किंवा प्रतिकूल हवामानाचा विचार करण्यात आला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


"पोस्ट पुन्हा एकदा वाचली असता, ती दुबईची खिल्ली उडवणारी नाही असं दिसत आहे. पण मुद्दा तोच आहे की, दुबई मुसळधार पावसाचा सामना करेल अशाप्रकारे उभारण्यात आलेली नाही. मग पावसाचा स्त्रोत काहीही असो. कोणत्याही टोकाची हवामान परिस्थिती हाताळण्यासाठी शहरं उभारणं अव्यवहार्य ठरेल"



नेटकऱ्यांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया


आनंद महिंद्रा यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी दुबईची स्वच्छता, तयारी याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मुंबईने पावसाचा सामना करण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेचा दाखला दिला आहे.