नवी दिल्ली : मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत. टाटा ग्रुपनंतर आता जेट एअरवेज आणि स्पाईसजेटही या स्पर्धेमध्ये आलं आहे.


एअर इंडियाचा मोठा मार्केट शेअर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियाचा घरगुती मार्केट शेअर १४ टक्के आणि आंतरराष्ट्रीय मार्केट शेअर १७-१८ टक्के एवढा आहे. त्यामुळे एअर इंडियाला विकत घेणाऱ्या एअर लाईन कंपनीला मोठा फायदा होणार आहे. जेट एअरवेज आणि स्पाईस जेटकडे एअर इंडियाला विकत घेण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


स्पाईस जेट आणि जेट एअरवेजचं स्पष्टीकरण


एअर इंडियाला विकत घेण्याइतकी स्पाईस जेट एवढी मोठी कंपनी नाही, अशी प्रतिक्रिया स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तर एअर इंडियासाठी बोली लावण्याबाबत विचार सुरु असल्याचं वक्तव्य जेट एअरवेजच्या सूत्रांनी केलं आहे.


टाटा ग्रुपही स्पर्धेमध्ये


मागच्या महिन्यामध्ये झालेल्या मुलाखतीत टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी आपण एअर इंडिया विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं होतं. विमान सेवा व्यवसाय वाढवण्यासाठी एअर इंडियासाठी बोली लावण्याचा विचार असल्याचंही चंद्रशेखर म्हणाले होते.


सिंगापूर एअरलाईन्ससोबत खरेदी करू शकतात खरेदी


चंद्रशेखर यांनी सरकारसोबत केलेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये ५१ टक्के हिस्सा आणि कंट्रोलिंग स्टेक विकत घेण्याबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. टाटा ग्रुप सिंगापूर एअरलाईन्ससोबत पार्टनरशीप करून एअर इंडियाला विकत घेऊ शकतात.


इंडिगोनंही व्यक्त केली इच्छा


एअर इंडियातला हिस्सा विकत घेण्याची इच्छा इंडिगो एअर लाईन्सनंही व्यक्त केली आहे. ही माहिती विमान मंत्रालयानं दिली आहे. पण त्यावेळी इंडिगोसोडून कोणत्याही कंपनीनं अशी इच्छा व्यक्त केली नव्हती.


५२ हजार कोटींचं कर्ज


मागच्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात आहे. कंपनीवर तब्बल ५२ हजार कोटींपेक्षा जास्तच कर्ज आहे. यासाठी ३० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं होतं. यापैकी २४ हजार कोटी रुपये एअर इंडियाला मिळाले. नुकतंच बँक ऑफ बडोदानंही एअर इंडियाला कर्ज दिलं होतं.