`भात... भात` म्हणत भुकेनं व्याकूळ चिमुरडीनं सोडला जीव!
झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागलाय.
रांची : झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागलाय.
अवघ्या ११ वर्षांच्या संतोष कुमारीच्या पोटात गेल्या कित्येक दिवसांपासून अण्णाचा एक कणही गेला नव्हता. संतोष आपल्या कुटुंबीयांसोबत सिमडेगा जिल्ह्यातील जलडेगा प्रखंडातील कारीमाटी या गावात राहत होती.
रेशनिंग कार्ड आधारला लिंक नव्हतं...
मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार, संतोषची आई कोयली देवीकडे बीपीएल कार्ड होतं... परंतु, रेशनिंग दुकानदारानं हे कार्ड आधारला लिंक नसल्याचं सांगत त्यांच्या कार्डावर अन्नधान्य नाकारलं... आणि त्यांनी रेशनिंग कार्डही रद्द करून टाकलं. यामुळे त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून अन्न मिळणंही दुरापास्त झालं होतं.
मंत्र्यांनी जबाबदारी झटकली
परंतु, झारखंडच्या अन्न पुरवठा मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांचे रेशनिंग कार्ड आधारला लिंक केलेले नसतील त्यांनाही राशन देण्यापासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही... आणि अशा प्रकारचे स्पष्ट आदेश जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे देण्यात आलेत.
गरिबी रेषेच्या खालच्या स्तरावर असणाऱ्या संतोषच्या कुटुंबीयांपैंकी कुणाकडेही नोकरी नाही... संतोषची आई जे घरकाम करते त्यावरच त्यांचं घर चालतं... वडील मानसिकरित्या आजारी आहेत... त्यामुळे आईही कुठे जाऊ शकत नव्हती... अशावेळी संपूर्ण कुटुंब राष्ट्रीय अन्न सुरक्षेद्वारे मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून होतं... तेही नाकारलं गेल्यावर 'भात... भात' करत भूकेनं आपला जीव सोडणाऱ्या संतोषला तिची आई पाहत होती... परंतु, तिला वाचवण्यासाठी ती काहीही करू शकली नाही.