झारखंड विधानसभा २०१९ : कडक सुरक्षा व्यवस्थेत २४ केंद्रांवर होणार मतमोजणी
एक्झिट पोलचे कल काँग्रेसच्या बाजूने
रांची : jharkhand assembly election results 2019 झारखंड विधानसभेतील ८१ जागांसाठीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरु होणार आहे. राज्यातील ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असणार आहे. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकूण १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. या निकालांमध्ये यंदाच्या वर्षी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अर्थातच विरोधी पक्षांची याकडे करडी नजर असेल.
यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री रघुवर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएम आणि सुदेश महतो यांच्या एजेएस पक्षाला किती जागा मिळतात याकडे सगळ्याचं लक्ष असेल. २०१४ मध्ये भाजपला ३७ तर झारखंड मुक्ती मोर्चाला १९ आणि काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या.
जमशेदपूर पूर्वेच्या जागेवर सर्वांचं लक्ष
जमशेदपूर पूर्व येथील जागेवरून मुख्यमंत्री रघुवर दास यांना या निकालांमध्ये कोणतं स्थान मिळतं हो पाहण्याजोगं ठरेल. १९९५पासून दास या जागेवर निवडून येत आहेत. येथे त्याच्या विरोधात सरयू राय रिंगणात उतरले होते. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानंतर थेट बंडखोरी करत मुख्यमंत्र्यांनाच आवाहन दिलं. याव्यतिरिक्त जागांविषयी सांगायचं झाल्यास, दुमका, बरेट या जागांवरही अनेकांचं लक्ष असेल. झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वाट्याला येणारी मतं निर्णायक ठरतील.