रांची : झारखंडच्या चाईबासामधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं एका शाळेच्या प्राचार्यांनी चोरी उघडकीस आणण्यासाठी १२ विद्यार्थ्यांचे हात मेणबत्तीवर धरण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सात विद्यार्थ्यांचे हात अतिशय गंभीररित्या भाजलेत. 


२०० रुपयांची चोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील चक्रधरपूरच्या बरुटा मेमोरियल नावाच्या एका खाजगी शाळेत ही घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, बरुटा शाळेत चौथीच्या एका विद्यार्थ्याचे २०० रुपये चोरीला गेले होते. या विद्यार्थ्यानं तक्रार केल्यानंतर प्राचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून सत्य उघडकीस आणण्यासाठी अशा किळसवाण्या आणि धक्कादायक प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षा दिली.


प्राचार्यांचा अंधविश्वास


३१ जानेवारी रोजी शाळेच्या प्राचार्यांनी चोरी पकडण्यासाठी वर्गात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडे चोरीबद्दल चौकशी केली. परंतु, कुणीही चोरीचा आरोप स्वीकार केला नाही. तेव्हा प्राचार्यांनी मेणबत्ती जाळून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यावर हात ठेवण्यास सांगितलं... धक्कादायक म्हणजे, ज्यानं चोरी केली असेल त्याचाच हात जळणार आणि ज्यानं चोरी केली नसेल त्याला त्याला काहीही होणार नाही, अशी शिक्षकांची धारणा होती.


त्यामुळे विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं त्यांनी मेणबत्तीवर हात ठेवायला आणि चोरी न करण्याच्या शपथा घ्यायला लावल्या. पण, यामध्ये सात विद्यार्थ्यांचे हात गंभीररित्या भाजलेत. यामध्ये चार विद्यार्थी आणि तीन विद्यार्थीनींचा समावेश आहे.



पालकांमध्ये संताप


विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राचार्यांचं हे कृत्य अमानवीय असल्याचं म्हणत आपला रोष व्यक्त केला. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वागू शकतो, यावर लोकांचा विश्वासही बसत नाही. पण, या घटनेमुळे पालक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. 


उल्लेखनीय म्हणजे, या मिशनरी शाळेत गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत... कारण शाळेची फी कमी आहे. या घटनेनंतर पालक चांगलेच संतापले असेल तरी आपल्या मुलाला शाळेतून काढून टाकलं जाईल या भीतीनं ते कॅमेऱ्यासमोर यायला घाबरत आहेत.