Jharkhand Crime : मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. प्रत्यक्षात अस होताना कुठे पाहायला मिळत नाही. मात्र झारखंडमध्ये चक्क पोलिसांनी आरोपींनी रस्त्यावर फेकलेले पैसे उचलल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या कृत्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरु झाली आहे. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आणि पोलीस प्रशासनाची बदनामी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधील पोलीस रस्त्यावरून लाचेचे पैसे गोळा करण्यात मागेपुढे पाहत नाहीत हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस विभागाला लाजवेल असा हा व्हिडीओ रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामध्ये पोलीस रस्त्यावरून पैसे उचलताना दिसत आहेत. तिथल्या कोळसा तस्करांनी फेकलेले पैसे उचलून पोलिसांनी आपल्या खिशात घालताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये रामगढ ते रांची महामार्गावर उभे असलेले पेट्रोलिंग पोलीस अवैध कोळसा व्यापाऱ्यांनी रस्त्यावर फेकलेले पैसे उचलताना दिसत आहेत. त्यानंतर चार पोलिसांना निलंबित करण्यात आले.


काकेबार बायपासजवळ रामगड पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग वाहन रस्त्याच्या कडेला उभे आहे. त्यानंतर पीसीआरमधून बाहेर आल्यानंतर एक हवालदार रस्त्याकडे जातो आणि काहीतरी घेण्यासाठी खाली वाकतो. तेव्हा एक-एक करून बेकायदेशीर कोळसा भरलेल्या बाईक जवळून जातात. तितक्यात हवालदार रस्त्यावर वाकून पैसे गोळा करतो. कोळसा बाईकवरून अवैध कोळसा वाहतूक करताना वाटेत पोलिस दिसले तर लाचेचे पैसे रस्त्यावर फेकून पुढे निघून गेले होते. यानंतर पोलिसांनी रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्यास सुरुवात केली.


हा धक्कादायक व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेतली. त्यानंतर जगनारायण राम, ओमप्रकाश महातो, मंटू मुंडाआणि राकेश कुमार शर्मा यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रामगढचे पोलीस अधीक्षक पीयूष पांडे यांनी दिली.


दरम्यान, इथल्या अवैध कोळसा व्यवसायात माफियांचा हात आहे. बोकारो आणि रामगड येथून हजारो बाईक या कोळसा लादून ओरमांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध कोळसा डेपोत जातात. राजरप्पा आणि रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुट्टुपालू खोऱ्यातून दररोज बेकायदेशीर कोळसा भरलेल्या बाईक पोलिसांसमोरच बिंधास्त पुढे जातात आणि त्यांच्यासमोर पैसे फेकतात. अवैध कोळसा घेऊन जाताना बाईकस्वार रस्त्यावर 100 ते 200 रुपये फेकतात. रांचीच्या रामगढ आणि ओरमांझी परिसरात अशाच प्रकारचे दृश्य पाहायला मिळते. रांचीच्या ओरमांझी पोलीस ठाण्याच्या परिसरातील बेकायदेशीर कोळसा डेपोमध्ये दररोज सुमारे 1000 बाईक बाहेर पडतात आणि प्रत्येक बाईकवर 10 ते 12 पोती कोळसा असतो. त्यामुळे विचार करा किती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असेल.