मुंबई : रिलायन्स जिओने मोठं यश दिल्यानंतर मुकेश अंबानी आता आणखी एका नव्या क्षेत्रात उतरणार आहेत. एअरटेल आणि पेटीएम प्रमाणे रिलायंस जिओ देखील पेमेंट बँक सुरु करणार आहे. भारतच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी लवकरच पेमेंट बँक सुरु करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायंस इंडस्‍ट्रीजने यासाठी नेटवर्क आणि इंफ्रास्‍ट्रक्‍चर टेस्‍ट‍िंग देखील सुरु केलं आहे. हे टेस्‍टिंग यशस्वी झालं की, आरआयएल याची अधिकृत घोषणा करणार आहेत.


जिओ पेमेंट बँक


जिओ पेमेंट बँक लाइसेंस मिळाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, इंडिया पोस्ट आणि फिनो पेमेंट्स बँकेला टक्कर देण्यासाठी उतरणार आहे. रिलायंस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने एअरटेल पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स बँकला टक्कर देण्यासाठी 70:30 प्रमाणे करार केला आहे. एप्रिल 2018 मध्ये हा करार झाला होता.


एअरटेलने नोव्हेंबर 2016 मध्ये बँक सुरु केली होती. दुसरीकडे पेटीएम पेमेंट्स बँकने मे 2017 मध्ये याची सुरुवात केली होती. फिनी पेमेंट्स बँक मागच्या वर्षी जूनमध्ये लॉन्च झाला होता. जिओ पेमेंट देखील आता या स्पर्धेत उतरत आहे. 


काय आहे पेमेंट बँक ?


पेमेंट्स बँक मॉडल 2013-14 मध्ये भारतीय रिजर्व बँकने देशात व्यवहार आणखी जलद करण्यासाठी सुरु केले. यामुळे आर्थिक क्षेत्रात मोठा बदल झाला. पेमेंट बँक फक्त व्यवहार करताना पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरण्यात येते. यामध्ये कर्ज यासारखे इतर बँकिंग सेवा नाही मिळत.


पेमेंट्स बँकमधून 1 लाखापर्यंत व्यवहार करता येतात. मोबाइल पेमेंट्स, रिसीविंग, ट्रांसफर, खरेदी किंवा इतर बँकिंग सेवेसाठी तुम्ही ते वापरु शकता.