बिहार विधानसभा निवडणुकीआधी जीतन राम मांझी यांची गुरुवारी एनडीएमध्ये वापसी
जीतन राम मांझी यांची घरवापसी
पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी अखेर बिहार विधानसभा निवडणुकीत आपला राजकीय मित्र निवडला आहे. महाआघाडीतून वेगळे झाल्यानंतर मांझी आता गुरुवारी जेडीयूशी युतीची घोषणा करतील. महाआघाडीशी संबंध तोडल्यापासून आतापर्यंत ते एनडीएत लवकरच प्रवेश घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
नितीशकुमार यांनी जीतन राम मांझी यांना पुन्हा एनडीएमध्ये आणलं आहे. हिंदुस्तान अवाम मोर्चा जेडीयूशी युतीची घोषणा 3 सप्टेंबरला करणार आहे. तसेच जीतन राम मांझी आपला पक्ष जेडीयूमध्ये विलीन करू शकतात, अशी देखील शक्यता वर्तवली जात होती. पण आता युती होणार असल्याचं समोर आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जीतन राम मांझी यांनी जेडीयू स नितीशकुमार मांझी यांनी जेडीयूसोबत जाण्याचं नक्की केलं असून त्यांना जेडीयूच्या कोट्यातून नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. यावर मांझी यांनी सहमती दर्शविली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वाईट पराभवानंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री केले. पण सुमारे ९ महिन्यांनंतर त्यांनी मांझी यांना दूर केले आणि ते स्वत: मुख्यमंत्री झाले. यानंतर मांझी यांनी स्वत: चा वेगळा पक्ष स्थापन केला. मांझी यांनी २०१५ ची विधानसभा निवडणूक एनडीएबरोबर लढवली. परंतु त्यांना फक्त एक जागा जिंकता आली. त्यानंतर त्यांनी महाआघाडीशी हातमिळवणी केली. मांझी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुका महाआघाडी सोबत लढवल्या.
निवडणूकीचे धोरण काय असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याचा निर्णय करण्यासाठी समन्वय समिती असावी अशी महाआघाडीत असताना जीतन राम मांझी यांनी मागणी केली होती. मात्र मांझीची ही मागणी आरजेडीने फेटाळून लावली आणि 22 ऑगस्ट रोजी नाराज असलेले मांझी यांनी महाआघाडीसोबतचे संबंध तोडले. यानंतर 27 ऑगस्ट रोजी मांझी यांनी नीतीशकुमार यांची भेट घेतली. तेव्हापासून ते लवकरच एनडीएमध्ये येऊ शकतात. अशी शक्यता वर्तवली जावू लागली.
हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ता दानिश रिझवान म्हणाले की, 'नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये विकासाचे वारे वाहत आहेत आणि एनडीए चांगले काम करत आहे. अशा परिस्थितीत येत्या 24 तासात त्यांच्या पक्ष युतीबाबत निर्णय घेईल.' मांझी यांनी आता जेडीयूबरोबर जाण्याचे ठरवले असून गुरुवारी यावर शिक्कामोर्तब होईल, हे स्पष्ट झाले आहे.