श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये प्रादेशिक लष्कराच्या गाडीला आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे. गाडीला आग लावण्यात आल्यानंतर एक जवान बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्याकडून शोध मोहीम सुरु असून बेपत्ता झालेल्या जवानाचा शोध सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री उशिरा काही दहशतवाद्यांनी कुलगाममधील दमाल हंजीपोराजवळ, सैन्यातील एका जवानाच्या गाडीला थांबवून आग लावण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानाचं अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. गाडीला आग लावण्यात आल्यानंतर त्या जवानाची कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेला जवान दक्षिण काश्मीरमधील शोपियां येथून आपल्या ड्यूटीवरुन परतत असताना ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.


एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला असून, बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पोलीस आणि सुरक्षादलाकडून बेपत्ता जवानाचा शोध सुरु आहे.