नवी दिल्ली : जेएनयूच्या आवारात रविवारी झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी चार दिवसांनंतरही कोणाला अटक करण्यात आली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्यात येईल असा केवळ  दावा करण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार वर्षांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरलेले कुलगुरू एम. जगदेश कुमार यांच्या अकार्यक्षमतेवर मोदी सरकारने तीव्र नापसंती व्यक्त केलीय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी जेएनयूचे कुलगुरू जगदेश कुमार यांची खरडपट्टी काढल्याची सूत्रांची माहिती आहे. 



जेएनयूतील शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी जगदेश कुमार यांच्या हकालपट्टीची एकमुखी मागणी केली आहे. तर दुसरीकडे जेएनयूच्या विद्यार्थ्यांना मिळणऱ्या पाठिंब्याबाबत कुलगुरुंनी संताप व्यक्त केलाय. विद्यापीठ बंद ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केल आहे.


कुलगुरुंना विरोध 


जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) चे कुलगुरु (vice chancellor) जगदीश कुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी करत विद्यार्थी आणि शिक्षकांनी 'दिल्ली मार्च'चं आयोजन केलं होतं. यासाठी आंदोलक युनिव्हर्सिटी ते मंडी हाऊसपर्यंत पायी चालत जाणार होते. परंतु, जेएनयू गेटवरच पोलिसांनी त्यांना रोखलंय. विद्यार्थी मात्र आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले पाहून सुरक्षा व्यवस्थेत आणखीन वाढ करण्यात आलीय.