Job News : ठरलेल्या वेळेत नोकरीच्या ठिकाणी जाणं, तिथं जीवतोड काम करणं, निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी योगदान देणं असंच कामाचं स्वरुप सध्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पाहायला मिळतं. अनेकदा या कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार असतो किंवा नसतो, पण त्यांची किमान गरज असते ती म्हणजे सुट्ट्यांची. सोशल मीडियावर व्हायरल होणारे Reel पाहता हल्लीच्या नोकऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मागताना फारच ओढाताण करावी लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्टी सहजासहजी मिळत नसल्यास कधी आजारपणाचा बहाणा करून, कधी एखादं कारण सांगून ही सुट्टी घेण्यासाठी कर्मचारी शक्कलही लढवतात. पण, एका कंपनीकडून कर्मचाऱ्यांपुढं असणारी ही शक्यता आणि संधीसुद्धा उधळून लावण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये कथित स्वरुपात खासगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वर्षअखेरीस एकही सुट्टी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करणारी जाहीर सूचना लावण्यात आली आहे. 


सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट... 


'नोव्हेंबर 25 ते डिसेंबर 31 पर्यंत सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट काळ असेल. वेळेच्या बाबतीतही कोणतीही हयगय स्वीकारार्ह नसून, भरपगारी रजा, आजारपणाची रजाही कोणी घेऊ नये. आपल्यासाठी हे वर्षातील सर्वाधिक कामाचे दिवस असून, आपण सर्वांनी सर्वस्वी काम करणं अपेक्षित आहे, धन्यवाद!' असं लिहिलेलं एक पत्रकच कंपनीत लावण्यात आल्याचा फोटो सध्या अनेकांचा रोष ओढावताना दिसत आहे. 


नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, हेच इथं स्पष्ट होत आहे. 'हे जे काही सुरुये ते योग्यच आहे असं कॉर्पोरेट क्षेत्रांना का वाटतं. दुर्दैवानं मी आजारी पडलो, तर कंपनीला त्याचं काहीच उणंधुणं नसतं', रेडिटवर कंपनीतील हा फोटो व्हायरल होताच एका युजरनं तीव्र शब्दांत संपात व्यक्त केला. 'उद्या तुमचं काही बरंवाईट झालं तरीही तुम्ही कंपनीला हे तीन दिवस आधीच कळवणं अपेक्षित असेल', असा खोचक टोला लगावत आणखी एका युजरनं कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या या जीवघेण्या ट्रेंडचा निषेध केला. 


Why does corporate think this is ok?
byu/Goodn00dl3 inmildlyinfuriating

हेसुद्धा वाचा : Viral Video : एक होत्या बाई, त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम


मागील काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये वाढलेल्या स्पर्धांमुळं कंपन्या कर्मचाऱ्यांकडून चौकटीबाहेरच्या अपेक्षा ठेवताना दिसत आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारापासून सुट्ट्यांपर्यंत प्रत्येक लहानसहान गोष्ट त्यांच्या कामाशी जोडली जात असून, एक विषारी वाचावरण कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या अशा वातावरणाबद्दल आणि नव्यानं काढल्या जाणाऱ्या विचित्र नियमांबद्दल तुमचं काय मत?