पुढच्या दहा वर्षात जम्मू आणि काश्मीर विकसित राज्यांच्या यादीत- अमित शाह
जम्मू आणि काश्मीर हे विकसित राज्यांच्या यादीमध्ये येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : पुढच्या दहा वर्षामध्ये जम्मू आणि काश्मीर हे विकसित राज्यांच्या यादीमध्ये येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीहून कटारा दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वेगवान वंदे मातरम एक्सप्रेसला त्यांनी हिरवा कंदील देत उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. अनुच्छेद 370 हे जम्मू काश्मीरच्या विकासात अडथळा होते याचा पुनरोच्चार त्यांनी केला. दिल्ली-कटरा 'वंदे भारत एक्सप्रेस' ही जम्मू काश्मीरच्या विकास आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी एक गिफ्ट असेल असेही ते म्हणाले.
गांधीजींच्या आयुष्यातून रेल्वे काढली तर त्यांच्या स्वातंत्र्याचे स्वप्न अर्धवट राहील. बापूजींनी स्वातंत्र्य चळवळीत रेल्वेचे खूप मोठे योगदान राहील्याचेही अमित शाह म्हणाले. अनुच्छेद 370 हे देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी विघ्न होते असे सांगत जम्मू काश्मीरच्या विकासाचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेससोबत सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीहून कटरापर्यंत जाणारी वंदे भारत एक्सप्रेस 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर या ट्रेनचे ऑनलाईन रिझर्वेशन करता येणार आहे. 1100 प्रवाशांची क्षमता असलेली ही ट्रेन वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी 8 तासांत दिल्लीतून कटरा पोहोचणार आहे.